विलेपार्ले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वर्धापन दिनी पाच पुस्तकांचे प्रकाशन

मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेच्या वर्धापनदिनी बालसाहित्याच्या पाच विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

मराठी भाषा दिन आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेचा वर्धापनदिन सोहळा विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे संकुलात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे तसेच ज्येष्ठ लेखक अरुण फडके यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक माधवी कुंटे लिखित ‘देशोदेशीच्या लोककथा’ हे ४ बाल कथासंग्रह तसेच लता गुठे लिखित ‘मुलांसाठी मजेदार काव्यकोडी’ अशा ५ पुस्तकांचे प्रकाशन झाले.

विलेपार्ले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने स्वरचित कथा स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण मंदाकिनी भट आणि पूजा राईलकर यांच्या हस्ते झाले. चित्रा वाघ यांना प्रथम पुरस्कार, उज्ज्वला पै यांना द्वितीय पुरस्कार आणि चारुलता काळे यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘पुस्तकं माणसाला घडवतात’ या विषयावर, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, नगरसेविका, लेखिका ज्योती अळवणी यांच्याशी सायली वेलणकर यांनी संवाद साधला.

प्रबोधनकार ठाकरे संकुलाचे अरविंद प्रभू आणि लेखक गुरुनाथ तेंडुलकर तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि रसिक श्रोते उपस्थित होते. संग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेच्या अध्यक्षा लता गुठे यांनी कार्यक्रमाचे सुरेख आयोजन नियोजन केले. सूत्रसंचालन प्रशांत राऊत आणि सायली वेलणकर यांनी केले, तर निशा वर्तक यांनी आभार मानले.
(गुरुदत्त वाकदेकर)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply