प्रबोधन आणि मनोरंजन

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे वातावरण फारच तापू लागले आहे, म्हणण्यापेक्षा बिघडू लागले आहे. प्रत्यक्ष वातावरणातील उष्मा वाढत असताना त्याच्या जोडीला राजकीय वातावरणही तप्त होत आहे. अर्थातच हे वातावरण परस्परविरोधी पक्षांचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यापुरतेच मर्यादित आहे. निवडणुकीचा प्रचार हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. या प्रचारातून मतदारांचे प्रबोधन होते आणि मनोरंजनही होत आहे. पाच वर्षांतून एकदा होणारा हा डोंबाऱ्याचा खेळ आहे. सात मे ही मतदानाची तारीख उलटून गेली की नंतर हा सगळा धुरळा शांत होणार आहे.

निवडणूक आली की त्यात प्रचार हा अविभाज्य भाग असतो. निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना आपल्यालाच मतदान झाले पाहिजे, यासाठी लोकांपर्यंत जाण्याकरिता प्रचार करावाच लागतो. त्याकरिता विविध साधनांचा उपयोग केला जातो. पूर्वी घरोघरी पत्रके वाटली जात. नंतर साध्या पत्रकांची जागा झुळझुळीत पत्रकांनी घेतली. आता हा प्रचार सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर होत आहे, पण त्याचबरोबर जाहीर सभा, कोपरा सभा, अंगण सभा, वाडी सभा, ओटीवरच्या सभा, माजघरातल्या सभा अशा विविध माध्यमांतूनही मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत. त्यातही प्रमुख पक्षांचे प्रमुख उमेदवार साहजिकच आघाडीवर आहेत. प्रचार करताना एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्यांवरच भर दिला जात आहे. निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची माहिती त्याला प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी लागते आणि ती कोणाही मतदाराला पाहता येऊ शकते. पण त्यात दिलेल्या माहितीपेक्षा कितीतरी वेगळी माहिती प्रचारसभांमधून मिळत असते. विशेष म्हणजे आपल्या स्वतःविषयी माहिती देण्यापेक्षा प्रत्येक प्रमुख उमेदवार विरोधी उमेदवाराचे वाभाडे काढण्यात धन्यता मानत असतो. प्रचारसभांमध्ये दिलेली माहिती आणि निवडणूक आयोगाकडे त्याने प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली माहिती यात बरीच तफावत असते. कारण कायद्याच्या चौकटीत जेवढा बसेल तेवढाच तपशील निवडणूक आयोगाला सादर केलेला असतो. अन्य तपशील जाहीर सभांमधून सांगून लोकांचे मनोरंजन करणे किंवा विरोधी पक्षाच्या उमेदवाराबद्दल मने कलुषित करणे एवढाच एक कलमी कार्यक्रम प्रत्येक उमेदवाराने आखून घेतलेला असतो.

दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक विकासाचे अधिकाधिक चांगले टप्पे पार करण्याचे एक साधन असते, पण विकासाच्या या मुद्द्याकडे सारेच प्रमुख उमेदवार दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांच्या त्यांच्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेले असतात, पण तो एक उपचार असतो. विकासाचे मोठे स्वप्न त्या जाहीरनाम्यामध्ये छापले गेलेले असते. मी स्वतः काय करणार आहे, त्या जाहीरनाम्याच्या दृष्टिकोनातून माझी जबाबदारी कोणती आहे, मतदारांनी मी काय देऊ शकतो, राज्याच्या आणि देशाच्या भल्यासाठी मी काय करू शकतो हे सांगण्याकडे उमेदवार सोयीस्कर दुर्लक्ष करत असतात. विरोधातला उमेदवार आपल्यापेक्षा किती वाइट आहे, किती अयोग्य आहे, याचा कंठशोष करण्यातच त्याला अभिमान वाटत असतो. त्यामुळे निवडणूक हा एक केवळ उपचार ठरतो. आज विरोधात बोलणारे उद्या कोणती संभाव्य युती किंवा महाआघाडी झालीच, तर त्यात एकमेकांच्या शेजारी बसायलाही कमी करणार नसतात. मतदार फक्त मतदानाच्या एका दिवसापुरता राजा असतो. निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांविषयीची साधकबाधक माहिती मिळाल्यामुळे मतदारांचे प्रबोधन होते, तर एकमेकांवर केलेल्या दोषारोपांमधून प्रत्येक उमेदवाराची रंजक माहिती मिळाल्यामुळे त्याचे मनोरंजनही होते. मूळ लोकशाही फारच दूर उभी राहते. या साऱ्यावर मात करून निवडून आलेल्या उमेदवारांना लोकांचे प्रतिनिधी म्हणून मान्यता देणे एवढीच लोकशाहीची इतिकर्तव्यता राहते.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २६ एप्रिल २०२४)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply