रत्नागिरी : गेली १२ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती तसेच विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ट्रस्टने यावर्षीसाठी १२ विशेष तपस्वी गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत.
विशेष तपस्वी गौरव पुरस्कारप्राप्त गौरवमूर्ती रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक, खासगी आणि ग्रामदेवता मंदिरांचे निवृत्त आणि विद्यमान पदाधिकारी, खोत, सरपंच, मानकरी व त्यांचे वारस आणि वहिवाटदार मालक या प्रवर्गातून निवडले आहेत. त्यापैकी १० देवस्थाने भारतीय संस्कृतीमधील पौराणिक देवदेवतांची असून २ देवस्थाने सामाजिक ऐक्याची प्रतीके आहेत. एकूण ४ मंदिरे खाजगी, १ मंदिर गावकीचे असून उर्वरित ७ मंदिरे ट्रस्टमार्फत चालवली जातात.
या विशेष तपस्वी गौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुस्तक आणि रोख दोन हजार रुपये असे आहे. या गौरवमूर्तीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ९ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.
उत्तर रत्नागिरीतील परशुराम (चिपळूण) येथील कोकण किनारपट्टीचा निर्माता अशा भगवान परशुरामाच्या मंदिराचे स्थानिक विश्वस्त हभप अभय नारायण ऊर्फ अभयमहाराज सहस्रबुद्धे, हेदवी (गुहागर) येथील दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिराची मातृसंस्था श्री लक्ष्मीनारायण संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद गजानन जोगळेकर आणि मोर्डे (संगमेश्वर) येथील शिवपार्वतीची मूर्ती असलेल्या (शंकराची पिंडी नाही) कोकणातील एकमेव शिवमंदिराचे कार्यवाह संजय वसंत सरदेसाई हे ३ जण गौरवमूर्ती आहेत.
दांडेआडोम (रत्नागिरी) येथील कार्तिकेय मंदिराचे पुरुषोत्तम विश्वनाथ दांडेकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या पतितपावन मंदिराचे निवृत्त अध्यक्ष ॲड. प्रदीप चंद्रकांत ऊर्फ बाबासाहेब परुळेकर, रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्नाशेठ सुर्वे, बंदर रोडवरील भगवान श्रीकृष्णाच्या अशा पुरातन मुरलीधर मंदिराचे वहिवाटदार मालक व सावकार फडके यांचे वंशज अतुल श्रीधर फडके (सध्या वास्तव्य ठाकूरद्वार, मुंबई), रत्नदुर्ग किल्ला येथील देवी भगवती मंदिराचे दुसऱ्या पिढीतील मानकरी व उपाध्यक्ष श्रीकांत भास्कर सारंग आणि पूर्णगड येथील सरदार फडके यांच्या खासगी श्रीराम मंदिराचे अध्यक्ष डॉ. श्रीराम नारायण फडके.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३ गौरवमूर्तींमध्ये कुडाळ येथील १०२ वर्षे जुन्या आणि कोकणातील पहिल्या साईमंदिराचे तिसऱ्या पिढीचे मानकरी राजन श्रीपाद माड्ये, परुळे (वेंगुर्ले) येथील ७०० वर्षांची परंपरा असलेल्या श्री. आदिनारायण (सूर्य) देवस्थानाचे अध्यक्ष अनंत शिवराम (सामंत) देसाई आणि दाभोली (वेंगुर्ले) या गावातील सुमारे १०० वर्षे जुन्या खासगी दत्तमंदिराचे वहिवाटदार मालक गौतम रमाकांत प्रभुदाभोळकर यांचा समावेश आहे.
पुरस्कारप्राप्त १२ व्यक्तींपैकी रत्नागिरी तालुक्याबाहेरील ७ सन्मानितांना त्यांचे सन्मानपत्र, शाल आणि पुस्तक त्यांच्या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्टाने पाठवले जाणार आहे. पुरस्काराची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील उर्वरित ५ सन्मानितांचा गौरव २४ जुलै २०२४ ते ५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्यांच्या निवासस्थानी करण्यात येणार आहे, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲड. सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.
बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या १२ तपस्वी गौरवमूर्ती सन्मानितांचा परिचय
उत्तर रत्नागिरीतील ३ गौरवमूर्ती :
(१) हभप श्री. अभयमहाराज नारायण सहस्रबुद्धे. कोकण पट्टीचा निर्माता , भगवान श्रीविष्णूचा सहावा अवतार अशा चिरंजीव भगवान परशुरामाचे मंदिर चिपळूण जवळ परशुराम क्षेत्री आहे, या संस्थानाशी संलग्न अशा भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळावर ८ वर्षे कोषाध्यक्ष आणि नंतर १५ वर्षे अध्यक्ष असलेले हभप श्री. अभयमहाराज सहस्रबुद्धे आता श्री भार्गवराम परशुराम संस्थानचे स्थानिक विश्वस्त आहेत. गेली ४५ वर्षे पंढरपूर माघवारीचे नियोजन करत आहेत. गुढीपाडव्यापासून ७ दिवस चालणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरीनाम सप्ताहाचे २६ वर्षे आयोजन करत आहेत. गांधी पीस फाउन्डेशन (नेपाळ) यांची मानद डॉक्टरेट आणि द फेअर व्हिजन फाउन्डेशन (लखनौ) यांचा भारतीय हिंदूरत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे. (संपर्क 7798958882)
(२) डॉक्टर श्रीपाद गजानन जोगळेकर. हेदवी (गुहागर) येथील श्री लक्ष्मीनारायण संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद गजानन जोगळेकर गेली १२ वर्षे या पदावर आहेत. या संस्थेच्या सुप्रसिद्ध दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिराची सेवा करताना आता ते पदाधिकारी आहेत. त्याशिवाय नाट्यक्षेत्राशी त्यांचा जवळच संबंध असून संगीत राज्य नाट्य स्पर्धेत ५ वेळा अभिनयाचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच संगीत नाट्य लेखनाचे पारितोषिक मिळाले आहे. (संपर्क 8975022763)
(३) श्री. संजय वसंत सरदेसाई. संगमेश्वर तालुक्यात मोर्डे या गावात श्री देव गणेश्वर देवस्थान ट्रस्ट असून तेथे सुमारे १२५ वर्षे जुने एक अनोखे शिवमंदिर आहे . या मंदिरात पारंपरिक पद्धतीने शंकराची पिंडी नसून शिवपार्वतीची मूर्ती आहे. या मंदिरात अर्ध प्रदक्षिणा न करता पूर्ण प्रदक्षिणा करतात तसेच शिवपार्वतीच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो. गावात नांदत्या घरांची संख्या कमी आहे, मात्र या देवस्थानाचे सचिव म्हणून संजय वसंत सरदेसाई सन १९९० पासून गेली ३५ वर्षे हनुमान जन्मोत्सव, श्रावणमास, त्रिपुरारी पौर्णिमा आणि शिवरात्री अशा एकूण ४ उत्सवांची सर्व जबाबदारी एकहाती पेलत आहेत. (संपर्क 9011916835)
रत्नागिरी तालुक्यातील ५ आणि मुंबईतील १ गौरवमूर्ती :
(४) श्री. पुरुषोत्तम विश्वनाथ दांडेकर. दांडेआडोम येथील श्री देव काशि विश्वेश्वर देवस्थानात भगवान शिवाचा पुत्र कार्तिकेय यांचे एक मंदिर आहे, या गावकीच्या मंदिराचे खोत म्हणून ८१ वर्षीय पुरुषोत्तम विश्वनाथ दांडेकर वर्षभर देवीची रूपे लावण्याचे ६ कार्यक्रम आणि अन्य वार्षिक ७ कार्यक्रम गेली ३५ वर्षे पार पाडत आहेत . कार्तिकेयस्वामीचे मंदिर वर्षातून एक दिवस ठराविक कालावधीसाठी महिलांना खुले होते. तिथीप्रमाणे तो काळ पाळावा लागतो आणि तशी व्यवस्था पुरुषोत्तम विश्वनाथ दांडेकर करतात. (संपर्क 7588755895)
(५) ॲडव्होकेट प्रदीप उर्फ बाबासाहेब परुळेकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेल्या पतितपावन मंदिराचे २०१८ पर्यंत अध्यक्षपद भूषविलेले ॲडव्होकेट प्रदीप चंद्रकांत ऊर्फ बाबासाहेब परुळेकर गेली ४४ वर्षे या कार्यात सहभागी आहेत. मंदिराची फेरउभारणी, स्वातंत्र्यवीर सावरकर म्युझियम, अभ्यागत पर्यटकांसाठी चित्रफित निर्मिती या उपक्रमांसह २०२० पासून स्वातंत्र्यवीर सावरकर कार्यजागरण उपक्रम राबवत आहेत. आपला वकिली पेशा, राजकारण आणि शैक्षणिक संस्थांचे कार्य सांभाळून साडेतीन तपांपेक्षा जास्त काळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी त्यांनी दिला आहे. (संपर्क 9422052329)
(६) श्री. रवींद्र उर्फ मुन्नाशेठ सुर्वे. यशस्वी हॉटेल व्यावसयिक आणि भंडारी समाजातील प्रतिष्ठित नागरिक असे मुन्नाशेठ सुर्वे शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आहेत. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी मंदिराच्या ट्रस्टचे आधी उपाध्यक्ष आणि कै. अरुअप्पा जोशी यांच्या पश्चात गेली १३ वर्षे अध्यक्ष आहेत. १२ वाड्यांच्या उत्सवाचे नियोजन आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने करत आहेत. (संपर्क 9423001300)
(७) श्री. अतुल श्रीधर फडके. बंदर रोडवरील भगवान श्रीकृष्णाच्या पुरातन मुरलीधर मंदिराची स्थापना सावकार फडके यांनी केली होती. त्यांच्या तिसऱ्या पिढीचे वहिवाटदार मालक अतुल श्रीधर फडके सध्या मुंबईत ठाकुरद्वार येथे वास्तव्य करून आहेत. व्यवसायाने सराफ आहेत. मंदिरात ५ दिवसांचा गोकुळाष्टमी उत्सव आणि त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव यांच्या जोडीला ते सामाजिक उपक्रम चालतात. आपल्या वडिलांच्या पश्चात २००९ पासून गेली १५ वर्षे सर्व व्यवस्था ते पाहत आहेत. (संपर्क 9820198036)
(८) श्री. श्रीकांत भास्कर सारंग. रत्नदुर्ग किल्ला येथील देवी भगवती मंदिराचे सारंग कुटुंबीय मानकरी आहेत. देवीच्या उत्सवाची सांगता सारंग यांनी सागराला श्रीफळ अर्पण केल्यानंतर होते. कै. भास्कर गोपाळ सारंग यांच्या पश्चात श्रीकांत भास्कर सारंग हे आता देवस्थानाशी निगडीत कर्तव्ये पार पाडत आहेत. सध्या ते उपाध्यक्ष आहेत. दररोज मंदिरात उपस्थित राहतात आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करतात. (संपर्क 7350489799)
(९) डॉक्टर श्रीराम नारायण फडके. सरदार फडके यांचे पूर्णगड येथे श्रीरामाचे खासगी मंदिर आहे. नित्यपूजा, माध्यान्य नैवेद्य, सायंआरती यांच्या जोडीला मंदिर स्थापनादिन, हनुमान जन्मोत्सव, गोकुळाष्टमी हे उपक्रम ग्रामस्थांच्या सहभागाने तेथे चालतात. रामनवमीचा उत्सव १० दिवस चालतो. स्वत: वैद्यकीय पेशाशी निगडीत असून वडिलांना लहानपणापासून मदत करणारे डॉ. श्रीराम नारायण फडके आता त्यांच्या वडिलांच्या पश्चात १९९८ पासून गेली २६ वर्षे सर्व व्यवस्था पाहत आहेत. (संपर्क 9422429743)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गौरवमूर्ती :
(१०) श्री. राजन श्रीपाद माड्ये. कुडाळ येथील १०२ वर्षे जुन्या आणि कोकणातील पहिल्या श्री साई दरबार या पुरातन मंदिराचे श्री. राजन श्रीपाद माड्ये हे तिसऱ्या पिढीचे मानकरी आहेत. त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या या मंदिरात १९९० पासून ते सेवा करत आहेत. त्यांच्या वडिलांच्या पश्चात १९९९ पासून गेली २४ वर्षे मुख्य कारभारी म्हणून ते सर्व व्यवस्था पाहत आहेत. (संपर्क 9422963589)
(११) श्री. अनंत शिवराम (सामंत) देसाई. परुळे (वेंगुर्ला) येथील ७०० वर्षांची परंपरा असलेल्या श्री. आदिनारायण (सूर्य) मंदिराचे गेली २७ वर्षे पदाधिकारी आणि विद्यमान अध्यक्ष श्री. अनंत शिवराम (सामंत) देसाई यांनी या मंदिराचा कायापालट केला आहे. इसवी सन १२५० ते १३०० मध्ये निर्मिती झालेल्या या मंदिराची १९९७ पासून एक प्रगत सौरपीठ म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे. नित्य कार्य, ३ वार्षिक उत्सव यांच्या जोडीला श्रीमद्भागवत, रामायण, देवी भागवत, दासबोध, सूर्यकथा आणि विविध याग आयोजित केले जातात. सुसज्ज भक्तनिवास उभा केला आहे. विशेष म्हणजे शालेय मुलांसाठी सूर्यनमस्कार स्पर्धांचे आयोजन केले जाते. (संपर्क 7822968093)
(१२) श्री. गौतम रमाकांत प्रभू दाभोळकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात दाभोली या गावात प्रभुदाभोळकर कुटुंबीयांचे सुमारे १०० वर्षे जुने खासगी दत्तमंदिर आहे. भाविकांना तेथे मुक्त प्रवेश आहे. या मंदिरात दैनंदिन पूजाअर्चा, गुरुद्वादशीसोबत सुमारे ८ ते ९ दिवस चालणारा वार्षिक दत्तजयंती उत्सव यांचा सर्व भार प्रभुदाभोळकर भावकी उचलते. या देवस्थानाचे मालक वहिवाटदार गौतम रमाकांत प्रभुदाभोळकर मनुष्यबळाची कमतरता असूनसुद्धा गेली ३० वर्षे सर्व उत्सव उत्साहाने साजरे करत आहेत. (संपर्क 9404936212)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

