महिलांच्या शाश्वत विकासासाठी रत्नागिरीत १२-१३ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय परिषद

रत्नागिरी : महिलांच्या शाश्वत विकासासाठी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात येत्या १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या समन्व्यक प्रा. डॉ. सोनाली कदम यांनी दिली.

मानवी समाजाच्या इतिहासात स्त्री-पुरुष समानतेचा प्रश्न नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. प्राचीन काळात अनेक संस्कृतींमध्ये स्त्रियांना ज्ञान, स्वातंत्र्य आणि अधिकार यांचा काही अंशी लाभ मिळत असे, परंतु काळाच्या ओघात स्त्रियांवर सामाजिक बंधने, परंपरागत बंधने व आर्थिक मर्यादा लादल्या गेल्या. परिणामी स्त्रियांना शिक्षणापासून, निर्णयप्रक्रियेतून व सामाजिक नेतृत्वापासून दूर ठेवले गेले. मात्र आता शिक्षणाने स्त्रीशिक्षण, समानता आणि सबलीकरण यांबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सावित्रीबाई फुले, कल्पना चावला , सुनीता विल्यम्स, किरण बेदी, तसेच कित्येक स्थानिक उद्योजिका अशी अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या पुरुषाला शिक्षण दिले तर एक व्यक्ती सुशिक्षित होतो, पण एका स्त्रीला शिक्षण दिल्यास संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते, असे म्हटले जाते. स्त्रीविषयक चळवळींचा परिपाक म्हणून शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण यांबाबत स्त्री सजग आहे.
स्त्रीला शिक्षण मिळाल्यास ती आत्मनिर्भर बनते, तिच्यात आत्मविश्वास वाढतो आणि ती स्वतःच्या हक्कांसाठी उभी राहू शकते तिचा व्यक्तिगत विकास होतोच पण तिचा कौटुंबिक स्तरसुद्धा उंचावतो. शिक्षित महिलांमुळे समाजात विवेकशील विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो. तसेच महिलांना नोकरी, व्यवसाय व नेतृत्वाच्या संधी मिळाल्याने त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावतात.
भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार दिला असला तरी व्यवहारात अनेकदा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. समानता केवळ शिक्षणापुरती मर्यादित नाही, तर रोजगार, राजकारण, मालमत्ता हक्क, आरोग्यसेवा आणि कुटुंबीय निर्णयांमध्येही ती लागू आहे. शैक्षणिक समानता, रोजगारातील समानता , करिअरमध्ये प्रगतीची समान संधी,राजकीय समानता, कायदेशीर समानता या केवळ कायद्यात आहेत म्हणून नाही तर मानवता म्हणून अंगीकारण्यात येणे तितकेच गरजेचे आहे.

एकूण समाजाच्याच शाश्वत विकासाकरिता महिलांचे सक्षमीकरण गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन, “महिलांच्या शाश्वत विकासासाठी महिलांचे शिक्षण, समानता आणि सबलीकरण” याचा आढावा घेण्याकरिता रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या पीएम-उषा – राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षा तर्फे १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे.

ही परिषद ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीत रत्नागिरीत हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे होईल. परिषदेत ऑस्ट्रेलियातील लॉरा विल्यम्स, युनायटेड किंग्डममधील बिर्गिट जलाव तसेच अटलांटिक येथील स्नोहोमिशच्या महापौर लिंडा रेडमॉन या व्यक्ती विषय तज्ज्ञ असणार आहेत. लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती सुमित्राताई महाजन यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही प्रा. डॉ. कदम यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply