मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. तसेच, रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.
लग्नसमारंभ, तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० व्यक्तींना, तर अंत्यविधीला जास्तीत जास्त २० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा, इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजित नियोजित कृतिकार्यक्रमांना अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जलतरण तलाव, व्यायामशाळा, स्पा बंद राहणार असून, केशकर्तनालये ५० टक्के क्षमतेने चालू राहणार आहेत. करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार असून, दररोज सकाळी ७ ते रात्री १० या वेळेतच ती उघडी ठेवता येणार आहेत.
थिएटर्स ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, खासगी कार्यालये, मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार असून, होम डिलीव्हरी सेवा पूर्ण वेळ सुरू राहणार. दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोसेस घेतलेले असणे बंधनकारक आहे. तसे नसल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार.
सार्वजनिक प्रवास, तसंच सुरू असलेल्या बहुतांश सार्वजनिक ठिकाणी लशींचे दोन डोसेस झालेल्यांनाच प्रवेशाची मुभा ठेवण्यात आली आहे.
‘आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही; पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे. अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
राज्य सरकारचे सविस्तर आदेश सोबत दिले आहेत.
ORDER-8th-Jan-2022Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media