रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांचे गृह विलगीकरण बंद, टाळेबंदीत वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी ब्रेक दे चेनअंतर्गत लागू केलेली टाळेबंदी येत्या १ जूनपर्यंत लागू राहणार आहे.

राज्याच्या सरासरीएवढ्या पॉझिटिव्हिटी दरापेक्षा १८ जिल्ह्यांमधील पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. त्यामध्ये सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, गडचिरोली, रायगड, पुणे, हिंगोली, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, अहमदनगर आणि लातूर हे ते जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) बंद करून रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी करोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिले. करोनाची सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था आतापर्यंत केली जात होती. ती यापुढे बंद करण्यात आली आहे. अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच दाखल व्हावे लागणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाने करोनाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेली टाळेबंदी रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अमलात होती. आता तिची मुदत वाढवून येत्या १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या काळात शेतीविषयक कामांसाठी कृषिविषयक दुकाने आणि वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply