करोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्यात आता ‘ब्रेक द चेन’; संपूर्ण नियमावली

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

मुंबई : करोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिपरिषदेने काही कडक निर्बंध लावण्यावर आज (चार एप्रिल) शिक्कामोर्तब केले आहे. आता मिशन बिगिन अगेनच्या ऐवजी ब्रेक द चेन आदेश लागू राहणार आहेत. रात्रीची संचारबंदी आणि दिवसभर जमावबंदी असे या मोहिमेचे स्वरूप असेल. सोमवार ५ एप्रिलच्या रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाईल. शेतीविषयक कामे, सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लावण्याचाही निर्णय झाला.

या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.

ब्रेक द चेनच्या काळात यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती अशी :

शेतीविषयक कामे सुरू

शेती आणि शेतीविषयक कामे, अन्नधान्य आणि शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
राज्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

बागा, चौपाट्या, समुद्रकिनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत, असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.

आवश्यक सेवेतील दुकानेच सुरू
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक आणि आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या दुकानांतील दुकानदार आणि कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे. तसेच स्वत: आणि ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे.

सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच
सार्वजनिक आणि खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक आणि दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
सार्वजनिक आणि खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
बसचालक, वाहक आणि इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा करोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत. तसेच प्रवासी मास्क घालतील, याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणीपुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.

शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत
थेट करोनाशी संबंधित नाहीत, अशा शासकीय कार्यालयांत कर्मचारी उपस्थिती ५० टक्के मर्यादेपर्यंत राहील.
शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभागप्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाइन घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.

मनोरंजन, सलून्स बंद
मनोरंजन आणि करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील. सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनीदेखील लवकरात लवकर लसीकरण करावे.

प्रार्थनास्थळे दर्शनार्थींसाठी बंद
सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थनास्थळे बाहेरून येणारे भक्त आणि दर्शनार्थीसाठी बंद राहतील. मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजाअर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरणदेखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.

उपाहारगृहे आणि बार पूर्णतः बंद
उपाहारगृहे आणि बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातांसाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.

खाद्यविक्रेत्यांसाठी पार्सल सेवा
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्यविक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल.

ई कॉमर्स सेवा सुरू
ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस एक हजार रुपये आणि संबंधित दुकान किंवा संस्थेस १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरू
वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल. मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.

शाळा-महाविद्यालये बंद राहतील. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

उद्योग आणि उत्पादन क्षेत्र सुरू
उद्योग आणि उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.

चित्रीकरण सुरू ठेवता येईल. मात्र गर्दीचा समावेश असलेले चित्रीकरण करू नये. तसेच सर्व कर्मचारी आणि चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल.

आजारी कामगाराला काढता येणार नाही
बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगाराला करोनाची बाधा झाली, या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल. कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.

सोसायटी मिनी कंटेन्मेंट
एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित केली जाईल. तसा फलक लावला जाईल. त्या इमारतीत बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी असेल.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply